थकबाकीदारांना फोन करण्यासाठी १६ ऑपरेटर; १० लाखांचा खर्च   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांकडून वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात येत आहेत. थकबाकीदारांना बिल भरण्यासाठी १६ डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन महिन्यांसाठी नेमण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण १० लाखांचा खर्च केला जाणार आहे.
 
करसंकलन विभागासमोर २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी वसुलीचे टार्गेट आहे. या आर्थिक वर्षांची मुदत ३१ मार्चला संपत आहे. त्यासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक आहेत. या विभागाने आतापर्यंत ८७० कोटी महापालिका तिजोरीत जमा केले आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागाने वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे हे थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच,वृत्तपत्रात थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे थकबाकीदार बिल भरण्यास पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
 
कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांना फोनद्वारे व एसएमएस करून बिल भरण्याबाबत सूचित करण्यात येत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सक्षम फॅसिलिटीजकडून ११० डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. त्या एजन्सीकडून थकबाकीदारांना फोन करण्यासाठी १६ डेटा एंट्री ऑपरेटर २ महिन्यांसाठी नेमण्यात आले आहेत. एका ऑपरेटरला २८ हजार ८९१ रुपये मानधन आहे. एका महिन्याचे ४ लाख ६२ हजार २५६ रुपये आणि दोन महिन्यांसाठी ९ लाख २४ हजार ५१२ रुपये इतके मानधनावर खर्च केले जाणार आहेत.

Related Articles